अलंग,मदन आणि कुलंग (AMK)- एक दिवसीय मोहीम.

एखादा इझी ग्रेड ट्रेक २०-२५ जणांना घेऊन करणे हे एक वेळ तसं सहज शक्य आहे आणि असे करणारे काही लोक, ग्रुप्स आपल्या आसपास दिसतीलही. पण अलंग,मदन आणि कुलंग सारखे तीन अवघड किल्ले एका दिवसात एवढ्या सगळ्यांकडुन करुन घेणे हे किंचित अशक्यच! अशा अशक्यप्राय गोष्टी तडीस नेण्यासाठी आवश्यक असते ती म्हणजे ठरवलेल्या ध्येयावर प्रचंड प्रेम आणि निष्ठा. प्रेरणेने, ध्येयाने झपाटलेले असल्याशिवाय अशा गोष्टी पूर्णत्वास जात नाहीत.

अरुण सर आम्हाला जेव्हा एखादी योजना सांगतात तेव्हा ती सुरवातीला नक्कीच यापूर्वी पूर्ण झालेल्या मोहीमा आणि योजनांपेक्षा पेक्षा जास्त आव्हानात्मक वाटते. मात्र परफेक्ट प्लॅनिंग करूनच ते मैदानात उतरतात! 

कुठलीही मोहीम आखताना आणि ती प्रत्यक्षात उतरवताना जेव्हा आपण अनुभवी गुरूंच्या मार्गदर्शनाखाली, योग्य पाहणी करून, पूर्वनियोजित अभ्यास करून त्याची योजना आखतो, रोज प्रॅक्टिस किंवा सराव करतो तेव्हा अपयश आपल्या आसपासही फिरकणार नाही हे नक्की! 

२६ जानेवारी २०१९ ला ही एक दिवसीय मोहीम पुर्ण केली. त्यांच्या isolation zone तर्फे ही AMK ची एकदिवसीय मोहिम आखली होती आणि मी त्या मोहिमेचा सदस्य होतो.




महाराष्टातील अवघड किल्यांपैकी AMK समजले जातात. बहुतेक जण ह्यापैकी पहिल्या दिवशी दोन किल्ले करतात मग एक मुक्काम करुन उरलेला तिसरा दुसऱ्या दिवशी पुर्ण करतात. पण आम्ही हे तिन्ही किल्ले एका दिवसात चढाई करुन फत्ते केले. 

ह्या किल्यांची चढाई करण्याकरता अलंगवर दोन ठिकाणी आणि मदन वर एका ठिकाणी अवघड रॉक क्लाइंबिंग करून जावे लागते. त्यासाठी क्लाइंबिंग आणि रॅपलिंगसाठी लागणाऱ्या चांगल्या प्रतीच्या इक्विपमेंट आणि सर्वात महत्वाचे म्हणजे टेक्निकली एक्स्पर्ट लीडरची गरज असते. अरुण सरांच्या मार्गदर्शनाखाली सागर दादा, सूरज,अमित, रोहित, अजिंक्य, यांच्यासोबत ही मोहीम फत्ते करू शकलो. अरुण सरांना ह्या फिल्ड मधील ४० वर्षांचा अनुभव आहे. त्यांच्याकडून, नेहमीप्रमाणे, याही वेळेस खूप नव्या गोष्टी आणि बारकावे शिकायला मिळाले.



शेवटी तुमचा स्वभाव, आव्हान पेलण्याची क्षमता, मानसिक निडरता असल्याशिवाय या गोष्टी शक्य नाही. एखादी मोहीम वेळेत पूर्ण करण्याचे आव्हान पेलायचे असल्यास खूप प्रमाणात शारीरिक आणि मानसिकरित्या झगडावं लागतंच. तेंव्हाच अवघड अशा एक दिवसीय मोहीम आपण सफल करू शकतो. सहभागी झालेल्या सगळ्यांच्या मेहनतीनं आणि मोहिमेआधी रोज केलेल्या सरावाने ही एकदिवसीय मोहीम पूर्ण झाली.



शेवटी सगळ्यांच्या चेहऱ्यावर आपण आज काहीतरी वेगळं आणि आव्हानात्मक केल्याची भावना आणि अवर्णनीय समाधान होतं! 

अरुण सरांच्या अनुभवी प्लँनिंग आणि ध्येयवेड्या प्रवासाला तसेच सर्वांच्या जिद्दीला, फिटनेसला, सलाम ...

Comments

Popular posts from this blog

चुन्याचा घाणा...

सोलो एकदिवसीय मोहीम...

कातळकोरीव हडसर...