सोलो एकदिवसीय मोहीम...

सोलो एकदिवसीय मोहीम - कात्रज-सिंहगड-राजगड-तोरणा ( KSRT )- 8 सप्टेंबर 2019

           मी कात्रज-सिंहगड-राजगड-तोरणा(KSRT) हा अल्ट्रा माऊंटन ट्रेल रन एका दिवसात पूर्ण केला, एकूण 64 किमी अंतर मी 23:30 तासांमध्ये पूर्ण केलं. 8 तारखेला पहाटे 12 ला कात्रज बोगद्यावरून सुरवात करून 8 तारखेला रात्री 11.30 ला तोरणा सर केला ...सुरवातीला वाटलं की एवढ्या पावसात हे धाडस नको करायला, काही मित्रांनी पण सल्ला दिला की नको जाऊ आणि एकटा तर नकोच..! मनात थोडी धाकधूक होतीच. पूर्ण ट्रेक सोलो करायचा होता ना..! पण मनात निर्णय झाला होता, 15 दिवसांपासून नियोजन चालू होतं, बॅकअप म्हणून राजकुमार दादा आणि सविता मॅडम वेल्हे ला येऊन थांबणार होते, आणि ह्या आधी असे लांब पल्ल्याचे ट्रेल एका दिवसात करायचा अनुभव पण होता. पण ते सगळे ग्रुप मध्ये केलेले .(K2S)कात्रज ते सिंहगड आता पर्यंत 30 वेळा केलेला असल्यामुळे रूट चांगला माहिती होता, पुढे सिंहगड ते राजगड रूट ची माहिती एका मित्राकडू घेतली, मॅप आणि त्याने केलेल्या रूट चा थोडा अभ्यास करून घेतला, राजगड ते तोरणा आधी केला असल्यामुळे तेथे पण काही अडचणीचा विषय नव्हता.8 तारखेला रात्री 12 वाजता कात्रज बोगद्याजवळून ट्रेक सुरू केला, थंडी होती आणि पावसाच्या संततधारा सुरू होत्या दोन टेकड्यानंतर वारा पण वाढला धुकं पण वाढायला लागलं, पहाटे 4 वाजता 13 टेकड्या संपवून मी टार रोड ने घाटातून 5.30 वाजता सिंहगडावर पोचलो (ट्रेकर साठी टार रोड ने चालायचं म्हणजे निखाऱ्यावरून चालल्यासारखंच). गडावर सगळीकडे फक्त धुकं च धुकं आणि पहाटे ट्रेक करून आलेली काही मंडळी, जेमतेम 15-20 जणच..! जर तुम्हाला सिंहगडावरची शांतता अनुभवायची असेल तर असं पहाटे 4-5 वाजता गडावर यायचं...स्वर्ग...!


               सिंहगड एवढा शांत पाहून बर वाटले, पुढे मला कल्याण दरवाजाने खाली उतरून विंजर ला जायचं होतं हा टप्पा सगळ्यात अवघड होता माझ्यासाठी. गडावरून पहाटे 6 वाजता पाली दरवाजाने खाली उतरायला सुरवात केली धुकं एवढं जास्त होत आणि पाऊस सुरूच असल्यामुळे पायवाट घसरडी झाली होती आणि बऱ्याच ठिकाणी गवत चांगलंच वाढलेलं त्यामुळे वेग जरा मंदावला होता 7.30 वाजता कल्याण गावाजवळ पोचलो तिथे गावकर्यांना विंजर कडे जाण्यासाठी ची वाट विचारली असता एक आजोबा बोलले की रस्त्यावर खूप झुडपं वाढलीत आणि गवत पण खूप वाढलंय, त्यांनी मला दुसऱ्या रस्त्याने जायला सांगितलं, पुढे चालायला सुरुवात केली धुकं थोडं कमी झालंत, सगळीकडे हिरवागार शालू नसलेले डोंगर आणि निसर्गाच्या त्या रुपाला बघत मी पुढे-पुढे चालत होतो 20 मिनीटांनी तो डोंगर चढून वर पोचलो तर माझ्या मार्क केलेल्या रूट पासून मी जरा डावीकडे गेलेलो आहे असं दिसलं परत त्या डोंगरावरून ठरलेल्या रूट वर यायला तासभर गेला 10.30 वाजता कोळवडी ला उतरून विंजर च्या दिशेने चालायला सुरुवात केली, उतरताना एक गावकरी भेटले त्यांच्याशी गप्पा मारत खाली उतरत 12.30 वाजता विंजर ला पोचलो. त्या काकांना मी एकट्याने कात्रज ते तोरणा करतोय हे सांगितल्यावर जरा नवल वाटलं.आतापर्यंत 40% ट्रेक पूर्ण झालेला आणि मी ठरवलेल्या वेळेपेक्षा अंदाजे 2 तास मागे होतो, कारण वाढलेल्या गवतामुळे मळलेली पायवाट पण दिसत नव्हती, पण रूट ची माहिती आणि नकाशा मुळे एवढी अडचण आली नाही ,BMC ( Basic Mountaineering Course) कोर्स मध्ये आम्हाला दिलेले फिटनेस-स्टॅमिना वाढवण्याचे धडे आणि शिकवलेल्या नकाशा वाचनाचा इथे आतापर्यंत बराच फायदा झाला होता. विंजर वरून गुंजवणे पर्यंत 10 किमी पूर्ण टार रोड ने जायचं होतं आणि हा टप्पा जास्त दमछाक करणारा होता.
              दुपारी 1.45 वाजता मी गुंजवणे गावात पोचलो, राजाराम रसाळ काकांच्या हॉटेल मध्ये गरमागरम मिसळ वर ताव मारला आणि चहा घेऊन पुढे निघायची तयारी केली..... रसाळ काकांचा निरोप घेऊन 2.30 वाजता राजगड चढायला सुरवात केली... "गडांचा राजा आणि राजियांचा गड" हे बिरुद अभिमानाने मिरवणारा राजगड चहोबाजूंनी धुक्यांनी वेढलेला होता, धुकं एवढं की दहा पावलापुढंच काही दिसतं नव्हतं, वाटेत काही मंडळी भेटली, माझी बॅग बघून त्यातल्या एकाने विचारलं आज गडावर कॅम्पिंग का...? त्यांना सांगितलं नाही कात्रज - सिंहगडावरून आलोय आणि पुढे तोरण्या वर जायचंय तेव्हा ते बघतच राहिले, थोडी विचारपूस करून मी पूढे निघालो, दीड तासातच चोर दरवाजाजवळ पोचलो, नियोजनाप्रमाणे अंधार पडायच्या आधी मला गड उतरून जेवढं तोरण्याच्या जवळ पोहचता येईल तेवढं पोहचायचं होतं.
गड चढताना जेवढं धुकं नव्हतं त्यापेक्षा जास्त धुकं गडावर होत पुढचं काही दिसतच नव्हतं, सरळ संजीवनी माचीकडे निघालो, वाटेत महाराणी सईबाईंच्या समाधी जवळ नतमस्तक झालो आणि मनात शिवराय, संभाजीराजांना वंदन केले, आळू दरवाजाने खाली उतरून तोरणा किल्ल्याकडे जाणारी पायवाट पकडली. आता ट्रेक मध्ये सगळ्यात जास्त वारा, पाऊस आणि धुकं इथून पुढेच लागणार होतं ह्याचा अंदाज होताच आणि तेच अनुभवत होतो, भयानक थंड वारा तेवढंच धुकं आणि सलग पडणारा पाऊस, आणि त्यामुळे 5 वाजताच अंधार पडल्यासारखं वाटत होतं.6.30-7.00 च्या दरम्यान डोंगर उतरून भुतोंडे गावाकडे जाणाऱ्या डांबरी रोड ला लागलो, मला आता इथून पुढे तोरण्याकडे चढाई करत जायचं होतं, दिवस मावळतीकडे झुकला होता पण दाट धुक्यामुळे जास्तच अंधार पडला होता. मी हेड टॉर्च चालू करून पुढच्या पल्ल्याकडे वेगाने चाललो होतो पण पावसामुळे आणि कारवीच्या दाट झुडपांमुळे माझा वेग जरा कमीच होता . एका उतरणीच्या ठिकाणी माझा पाय दगडावरून थोडा घसरला आणि मी कोलांटीउड्या घेऊन पडलो, उठून बसलो तर टॉर्च बंद...! मोबाईल काढून बघितलं तर टॉर्च मध्ये चिखल गेला होता, तसंच थोडं पुसून कशीबशी टॉर्च चालू केली आणि चालू लागलो, पण ह्या गडबडीत मी थोडा रस्ता चुकलो होतो आणि उजव्या बाजूला खाली गेलो होतो थोडं पुढं गेल्यावर मला अंदाज आला की आपण थोडं चुकलोय मग परत रूट कडे आलो आणि चालायचा वेग वाढवला, टॉर्च चा एक बल्ब चिखल गेल्यामुळे बंद पडलेला आणि अजून दीड तासाच अंतर बाकी होत, मनात थोडी भीती होती की टॉर्च ने काही दगा देऊ नये, आणि तेवढ्यात परत कोलांटीउडी... झालं ! कसाबसा उठलो आणि पहिली टॉर्च शोधली... तर टॉर्च चे दोन तुकडे झाले होते, आता मात्र मला जरा टेन्शन आलं. जवळ जवळ एक तासाचा ट्रेक राहिलेला आणि टॉर्च तर कामातून गेलेली, आता इथून पुढचा ट्रेक मोबाइलच्या टॉर्च च्या उजेडात करायचा होता, थोडं बसलो आणि पाणी पिऊन एक केळ खाऊन मोबाइलला पॉवरबँक जोडली आणि नीट रूट पाहून घेतला कारण एक तर मी ठरवलेल्या वेळेपेक्षा तीन तास लेट होतो आणि आता मला रूट चुकवायचा नव्हता. मी रूट पाहून पूढे चालायला सुरुवात केली. राजकुमार दादा आणि सविता मॅडम मी सांगितल्या प्रमाणे 8 वाजताच वेल्हे मध्ये येऊन थांबले होते. ट्रेक करत असताना बॅकअप टीम आणि सपोर्ट असणं खूप गरजेचं असत मग ती सोलो मोहीम असुद्या किंवा एखादा ग्रुप घेऊन ट्रेक करायचा असुद्या. 9 वाजता दादा चा फोन आला तेव्हा त्याला सांगितलं, होतं की तासाभरात पोचतोय तोरण्यावर ... 10.30 च्या दरम्यान दादा चा परत फोन आला की अरे पोचला का तू तेव्हा दादा ला टॉर्च फुटली हे सांगितलं आणि आता मी मोबाईल च्या उजेडात येतोय हे सांगितल्यावर त्या दोघांना पण जरा काळजी वाटली ... तो बोलला की आम्ही येऊ का पुढे थोडं. मी सांगितलं तुम्ही थांबा तिथेच मी पोचतोय. 11.30 वाजता मी तोरण्याच्या बुधला माची वर चढलो आणि शेवटी माझा एकदिवसीय सोलो ट्रेक संपला. दादा आणि सविता मॅडमना कॉल करून मी तोरण्यावर पोहचलो हे सांगितलं आणि झुंजार माची कडे चालू लागलो. 12 वाजले आणि सविता मॅडम आणि दादाचा वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी फोन आला दोघांनी मला शुभेच्छा दिल्या, मित्रांचे फोन, मॅसेज येत होते, वाढदिवशी मी तोरण्यावर होतो आणि माझं एक स्वप्न पूर्ण झालं होतं त्यामुळे तो क्षण खूपच जास्त भारी होता माझ्यासाठी... राजगड तोरणा दरम्यान मी जवळजवळ 6-7 वेळा घसरलो होतो आणि आता ते दुखणं जाणवायला लागलं होतं.

                   जवळपास 10 तास पावसात असल्यामुळे कपडे पूर्ण ओले झाले होते आणि तोरण्यावरच्या बोचऱ्या थंडीमुळे हातपाय थंड पडले होते, आणि अंग शहारत होत. अश्या मोहिमांसाठी मानसिक आणि शारीरिक अशी दोन्ही बाजुंनी तयारी करावी लागते, सोलो मोहिमेसाठी तर छोटया छोट्या गोष्टी परत परत तपासून घ्यावा, माझ्या कडे टॉर्च च्या बॅटरी होत्या त्याबरोबर अजून एक टॉर्च पण सोबत ठेवायला पाहिजे होती अस वाटलं. हवामानाचा अंदाज घेणं पण गरजेचं, निसर्गाच्या पुढे कुणाचं काही चालत नाही ह्याचा मला चांगलाच अनुभव आला, आणि खूप साऱ्या गोष्टी शिकायला पण मिळाल्या. पूर्ण रूट ची माहिती घेऊन सुद्धा मी 3-4 वेळा रस्ता चुकलो होतो, तोरणा उतरायला सुरुवात केली इथे मोबाईल च्या उजेडात मला धुक्यातलं नीट दिसत नव्हतं आणि त्यामुळे परत थोडं रस्ता चुकलो, दादा ने परत फोन करून विचारलं की अरे तू कुठं पर्यंत पोहचला आहेस, त्या दोघांच्या अंदाजाप्रमाणे मी खाली पोहचायला पाहिजे होतो, मी रूट वरच होतो पण धुक्यामुळे आणि थोडा थकवा भरल्यामुळे मला थोडा अंदाज येत नव्हता. मग दादाने मोबाईल मध्ये नेविगशन सुरू करून त्याच्या मदतीने मी एक तासाभरात तोरणा उतरून ते दोघे उभा होते तिथे पोहचलो. सपोर्ट टीम असल्याचा मला इथे खूप फायदा झाला दोघांनी शेवटच्या टप्प्यात मला वेळोवेळी मोटिव्हेट केलं.
दोघांनी माझं परत अभिनंदन केले, चिखलाने माखलेले कपडे बदलून त्यांनी आणलेलं जेवण करून मग आम्ही पुण्याकडे प्रस्थान केले...!

प्रशांत शिंदे.

Comments

  1. व्वा भावा������������मुजरा����

    ReplyDelete
  2. जबरदस्त, जणू मीच ट्रेक करतोय अस वाटलं

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

चुन्याचा घाणा...

कातळकोरीव हडसर...